आहे द्वंद तरीही ...

नुकतेच भानु काळेंचे ''बदलता भारत'' वाचून संपवले आहे.  जागतिकीकरण समजण्यासाठी त्यांनी केलेली भटकंती, विचारमंथन वाचण्याजागे आहे, यात शंकाच नाही.  पण, तो एक त्रयस्थपणे केलेला अभ्यास होता ,. मात्र  ''आहे कार्पोरेट तरीही'' हे त्या जागतिकिकरणाचा एक भाग असलेल्या लेखकाचे, भानु काळेंच्याच एका  मित्राचे आत्मकथन आहे आणि, म्हणूनच ते जागतिककीकरणाला उघड-नागडं करते,  त्यातलं जगणं समोर आणते.
जागतिकीकरणं ओळखण्याचा क्रायटेरिया काय?  मला तरी वाटतं की विरोधाभास आणि द्वंद.  कारणं, जागतिकीकरण झालेल्या अनेक ठिकाणी  अनेक लोक ,अनेक विचार,जे एकमेकाना विरोधीही असतात ते  एकत्र काम करत असतात आणि त्यात नेहमची एक लढाई, द्वंद सुरू असते.  मग ते भारत आणि इंडिया असे असो वा, रासायनिक वा जैविक खते असे असो किंवा इथिक्स का प्रॉफिट अस असो .. . असचं पण कार्पोरेटमधल द्वंद्व ,ज्याचे मुळ जागतिकीकरणात आहे ते  या पुस्तकाच्या पानापानातं भरलेलं आहे.
संजय भास्कर जोशी ...वयाच्या 43 वर्षी कार्पोरेट क्षेत्रातून निवृत्ती घेणारा बिग गॉस . त्यामुळं त्यांनी जेव्हा ''आहे कार्पोरेट तरीही.'' लिहीलं तेंव्हा ते वेगळं आणि कार्पोरेटबद्दल काहितरी सांगणार असणार असा अंदाज होताच, आणि ते तसे आहे देखील.. या पुस्तकातून दोन गोष्टी सतत दिसतात.  एक , कार्पोरेटचे अंतरंग....... वेगळी भाषा, मॉडर्ननेस आणि दारू हा प्रेस्टीज पॉईंट असणारा हा पार्ट.   या लिखाणातुन दिसते की भारत आता या सगळयाला सरावलेला आहे.  मग ते रूढी, परंपरांच्या कितीही विरोधी असो. आणि, देशाच्या भविष्याच्या वाटचालीतही या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. कारण याच व्यक्ती देश घडवत आहेत . दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॉर्पोरेटमध्ये असलेले सृजन. जे लेखकाला सांगायचे आहे, कॉर्पोरेटमध्ये माणूस यंत्रवत होतो ही नेहमीची ओरड.  पण नाही, त्याचे माणूसपण जागे असते, त्याला धक्का देत असतं.  दुर्देवाने बर्‍याचदा ते माणूसपण राजकारण, हेवा अशा ब्लॅक साईडन बाहेर पडते आणि मग समाजात  विविध कलाकृतीतून तेच समोर येते.  मग, संजयसारख्या क्रिएटीव्ह माणसाला त्याची  चांगली बाजू दाखवावीशी वाटणं साहजिकचं आहे, आणि विविध उदाहरणातून त्यांनी ती उत्तमपणे सांगितली आहे.  पण, एवढे सर्जन असुनही शेवटी लेखकाला नोकरी सोडावे लागते.  ...इथेच खरा विरोधाभास आहे.... कारण, ते ''कॉर्पोरेट'' आहे.
या क्षेत्राचं दुसरं लक्षण म्हणजे द्वंद .......  कागदवरची आकडेवारी ,रचना  आणि प्रत्यक्षातलं फील्ड वर्क  यात  फरक हा  नेहमी राहतोच.  आणि मग त्या दोन्हीत समन्वय साधताना पहिलं द्वंद  सुरु होत .वेगवेगळ्या पातळीवर अशी द्वंद्व खेळली जातात ,जी या पुस्तकात पानोपानी दिसतातच.  पण, मला वाटतं की यातलं सर्वात मोठं द्वंद असतं ते मन आणि मेंदूचं . या क्षेत्रात वावरताना, मनं कंटाळत आणि माणसाला दूर ओढू लागतं.  पण, त्याचवेळी मेंदू त्याला व्यावहारिक जगाची जाणिव करून देतो. पैसा पाहिजेच असे सांगतो  आणि त्याच चक्रात अडकवतो.  या द्वंदात जेंव्हा मन जिंकत तो क्षण मुक्तीचा....
जोशींना तो क्षण 43 व्या वर्षी गवसला.... त्यांचा मनाचा तो विजयदिवस.  पण, व्यापक अर्थानं पाहिलं तर तो आपल्या संस्कारांचा आणि संस्कृतीचा देखील विजय आहे.  लक्षात घ्या, वर्षाला मिळणार्‍या 30 लाखावर लाथ मारणं हे एका दिवसात जमतं नसतं.  त्यामागं तप असावं लागतं.  ''माझी झोप उडाली नाही'' ही, मानसिक खंबीरता त्याच तपातन येते.  संस्काराचं तप... पैसा हे साध्य नव्हे,  साधन आहे असा संस्कार कळत नकळत जो मराठी मनावर होतो.  त्याचा हा उत्कट अविष्कार आहे.  या ''जागतिकी करण्याच्या'' रेटयात हा संस्कार थोडासा बाजुला पडला होता.  पण, काळाच्या महिम्यामुळे ते पुन्हा प्रस्थापित होत आहे, एवढे मात्र नक्की.....! आणि संजय भास्कर जोशी आणि हे पुस्तक हे त्याचेच प्रतिनिधी आहेत असेही वाटते ..
परवा एक मित्र. सांगत होता.  4 वर्षे अमेरिकेत राहणार, नंतर भारतात येऊन भरपूर पैसा कमावणार आणि 35-40 व्या वर्षी नोकरी सोडून देणार.   तेंव्हा लक्षात आलं की संजय जोशी  किंवा चेतन भगत हे एका नव्या  पिढीचे निर्माते आहेत.  अशी पिढी जिला स्वत:चे पसायदान आहे.  भौतिक व मानसिक सुख  यातला समन्वय जी साधत आहे.  माझ्या दृष्टीने अशी पिढी जी ''भारतपण'' टिकवत आहे.  जोशी वा भगत ही नुसती सुरवात आहे.  ही जनरेशन वाढत जाणार आहे हे नक्की !  कारण जागतिकीकरणाचे, तिथल्या स्पर्धेचे, द्वंदाचे आणि आपल्या संस्काराचे ते अपरिहार्य प्रॉडक्ट आहे.  त्यामुळे, काही दिवसात 40+ नाटक ग्रुप वा 40+ लोकांचे साहित्य संमेलन दिसले, तर आश्चर्य वाटायला नको..........

0 comments:

Post a Comment