इतकं छोटही लिहिता येतं !


सुधीर गाडगीळ! काही माणसांविषयी ना एक अनाम कुतुहल असतं, त्यातलाच हा एक ...8000 पेक्षा जास्त मुलाखती घेणारा हा माणूस कसा असेल? काय असेल त्याच अनुभवविश्व? हे जाणुन घ्यायची इच्छा सगळयांचीच असते, नाही का? त्यामुळेच परिक्षेच्या काळात एखादं हलक फुलक पुस्तकं घ्यावं म्हणून ''अक्षरा''त गेलेलो असताना प्रभावळकरांच्या ''टिपरे'' ला मागं टाकून गाडगीळांच्या ''ताजतवानं'' न नकळत बाजी मारली.

दिवस परिक्षांचे होते, त्यामुळे वेळ मिळेल तसे पुस्तक वाचू लागलो. अवघ्या दोन पानांचा एक लेख. पेपरात लिहिताना छोटं लिहावं लागतं हे माहिती होतं. पण, ते छोट इतक छान लिहिता येत हे इथ दिसत होतं. पण, त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे ते फक्त लिहायच म्हणुन लिहित नव्हते तर त्यातून काही विचार देत होते, टिप्पणी करत होते. माणसांना ''ताजतवानं'' करणं हा त्यांचा स्थायीभाव आहे हे लोक 30 वर्ष जाणतात. ते त्यांनी करणं यात फारस नाविन्य नाही. पण, त्यातुन काही सांगण हे जास्त महत्वाचं आणि तेही सगळ्याना लगेच समजेल असं! गंमत म्हणजे यातल्याच काही मुद्यावर 4-4 पाने मी खरडल्याचे मला आठवते. पण, तेच त्यांनी 4 ओळीत त्याच ताकदीने मांडले. मग या निवेदकाच्या लेखणीला दाद द्यावयालाच हवी, नाही का?


गाडगीळ पत्रकार आहेत, त्यामुळं त्यांना ''नजर'' आहेच. पण ही नजर बातमी ऐवजी माणसं शोधीत जाते. त्यांन सांगितलेली माणसं आणि तयार केलेले ''नानाकाका'' हे भन्नाट पात्र ही त्याचीच देण असावी. पण, गाडगीळाची खरी ताकद दिसती ती त्यांच्या वन-लायनर मध्ये !! बहुतांश वेळा त्यांचे वनलायनर नशा चढवण्याचं, उतरवण्याचं आपल काम चोख करतात. आणि तंबी दुराईच्या ''एक हाफ'' ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

पण, हे वाचताना एक मोठा प्रश्न मनात घर करतो तो असा की आजच्या संगणकाच्या युगात त्याच्यापुढे डोळे लावून बसताना, ऑर्कुटवर गप्पा ठोकताना आपण आपली ही ''नजर'' हरवून बसलो आहोत का? मी अस म्हणण्यामागे एक कारण आहे ते लक्षात घ्या, गाडगीळांनी नेहमीच्याच विषयावर लिहिलंय, गणपती असो वा ऑलिंपिक ...आपणपण ते करतोच की...!!! मान्य आहे की, चटपटतीपणा आणायची ताकद त्यांच्यात आहे, पण ते कॉमन विचार तरी आपल्याला कुठं सुचतात ? एखादा टक लावुन बसलेला माणुस आपण नेहमी पाहतो पण कधी विचार केला का आपण की त्याच्या मनात काय चाललं असेल... त्यांनी सांगितलेली बरीचशी माणस तर आपल्या आजुबाजुलाच असतात! पण, आपण त्यांना शोधलेलंच नसतं, कारण, सोशल नेटवर्कींग वर आपण त्याचं प्रोफाईल शोधतो फक्त ....! ''भक्तीभाव'' हरवलाय हे कॉमन ऑबझर्वेशन! पण, आपण ते केलेलंच नसतं! आपण, माणस शोधणं आता बंद केलय हे खर , पण याचा परिणाम भविश्यात समाज संपण्यात झाला नाही म्हणजे मिळवलं!

पुनरूक्ती वगैर काही अपवाद वगळता हे पुस्तक निखळ आनंद, समाधानचे क्षण देत,विचार करायची संधी देतं हे मान्य. पण, माझ्यावर या पुस्तकानं कायमचा इफेक्ट केला तो 2 प्रश्न पाठीमागे सोडून जाण्याचा...! गाडगीळांविषयी कुतूहल होतेच. त्यामुळे त्यांचे 'सुहास्यवदने' मी पाहिलं होतचं! आणि 'ताजंतवान' वाचताना बघीतलं तर त्यातलचं बरचसं इथं होतं. त्यामुळे ''वैविध्याची विपुलता'' माझ्याबाबतीत तरी नष्ट झाली, एखाद्या कलाकाराने आपली एकच गोष्ट/कला वेगवेगळया माध्यमात सांगणे योग्य आहे का? असा प्रश्न मला वेळोवेळी पडत आलेला आहे. विशेषत: लेखक वक्त्यांबाबत...! याला एवढे कंगोरे आहेत की मी आजतागायत त्याचे उत्तर शोधू शकलेलो नाही, पण, ''ताजंतवानं'' न हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित मात्र केला

दुसरा प्रश्न असा की हे लिखाण 2000 सालचं आहे. पण ते आजही ताजतवानं वाटतय,आपल्याला सुट होतय.. हा ''युनिव्हर्सल'' पणाचं एखाद्या वर्तमानपत्रीय सदराचं यश असतं. पण, आजकाल असं पहिल्या धारेच लिखाण कुठ मिळेनासचं झालं आहे. पत्रांचे रकानेच्या रकाने प्रासंगिक लेखांनी आणि कलाकारांच्या सदरांनी भरत आहेत. पण, त्यात ''बुक व्हॅल्यू'' असलेलं लिखाण फारच कमी आहे. विनय हर्डीकर म्हणतात, तसे सुमारांची सद्दी सगळीकडेच आहे. पण, ती येथे येऊन चालणार नाही आहे. कारण, माणसाला माणूस बनवणार्‍या गोष्टीपैकी ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि, तिथले दुययमीकरण''माणूसपणावर'' नक्कीच घाला आणू शकते.

गाडगीळांनी आणलेलं ''ताजतवानं'' पण या प्रश्नानं निघून जात एवढं मात्र नक्की...!

4 comments:

Harshad Khandare said...

उत्तम..

Unknown said...

nice 1..
mi pan avarjun vachen te pustak...

Divya said...

"gadgilanchya ek-did pananchya lekhanvr koni itaka pn lihu shakat.. good ..... pustak nakki vachav lagel aata.. curiosity vadhati aahe..."

Abhijit Kulkarni said...

chhan......tajetavane punha vachale..........

Post a Comment