दोन फुल्ल एक हाफ

दोन फुल्ल

महाराष्ट्रात वृत्तपत्राचं फार प्रस्थ, लोकांचा जीव की प्राणच अगदी!  मग, यात सदरं असायची, आहेत.चर्चा,भांडणे, विवाद सगळे वृत्तपत्राच्या माध्यमातूनच. पण जेवणात जसे पापड असतात तसे पेपरमध्येही   काहीतरी खमंग, कुरकुरीत पाहिजेच की.  पूर्वी दळवी, नंतर कणेकर असे पापड तळण्यात माहिर होते.  पण दळवी गेले, आणि, कणेकरांचे पापड पचेनासे, रूचेनासे झाले.  पण, जेवणात पापड तर पाहिजेतच.  मग, टीकेकर नामक आच्यार्‍याने आपल्या लोकसत्ता खानावळीसाठी  एका भल्या माणसाला बोलावले.  म्हणाले, ''तळ पापड!'' हा पापड तळू लागला.  पण आपण पापड तळायचे या भीतीने त्याने नाव बदलले .मग आच्यार्‍यानेच   त्याला वेटर केला.  ''तंबी ' म्हणून तो पापड तळू लागला.

आहे द्वंद तरीही ...

नुकतेच भानु काळेंचे ''बदलता भारत'' वाचून संपवले आहे.  जागतिकीकरण समजण्यासाठी त्यांनी केलेली भटकंती, विचारमंथन वाचण्याजागे आहे, यात शंकाच नाही.  पण, तो एक त्रयस्थपणे केलेला अभ्यास होता ,. मात्र  ''आहे कार्पोरेट तरीही'' हे त्या जागतिकिकरणाचा एक भाग असलेल्या लेखकाचे, भानु काळेंच्याच एका  मित्राचे आत्मकथन आहे आणि, म्हणूनच ते जागतिककीकरणाला उघड-नागडं करते,  त्यातलं जगणं समोर आणते.

जरा लवकर जन्मलो असतो तर?

समोरच्याला भारावून टाकणं हा पणशीकरांचा गुणधर्म आहे.  ''तो मी नव्हेच!'' मध्ये ते प्रेक्षकाला भारावून टाकतात तर तोच मी मध्ये वाचकाला . ....तोच मी वाचताना पहिल्यांदा  वयाच्या 80  व्या वर्षी या माणसाला एवढं सगळं डिटेल आठवतं तरी कसं?  असा प्रश्न आपल्याला पडतोच!  पण, लवकरच त्या प्रश्नावर भारावलेपण मात करतं...!
''तोच मी!'' हे पणशीकरांचं प्रतिबिंब आहे.  त्यामुळे त्याबाबत बोलण म्हणजे पंताबाबत बोलणं होय.... सलग  ५० वर्षे निष्ठेने नाटक करणारा , वयाच्या 50 व्या वर्षी  बायपास होऊनही नंतरची 30 वर्षे दमदारपणे ''तो मी नव्हेच!''  चालवणारा हा खराखुरा माणूस आहे.  माझ्यासारख्या तरूणांना  ''निष्ठा कशाखी खातात?'' हे समजून घ्यायचे असेल, तर त्यांना पणशीकरांशिवाय दुसरा पर्याय नाही.

इतकं छोटही लिहिता येतं !


सुधीर गाडगीळ! काही माणसांविषयी ना एक अनाम कुतुहल असतं, त्यातलाच हा एक ...8000 पेक्षा जास्त मुलाखती घेणारा हा माणूस कसा असेल? काय असेल त्याच अनुभवविश्व? हे जाणुन घ्यायची इच्छा सगळयांचीच असते, नाही का? त्यामुळेच परिक्षेच्या काळात एखादं हलक फुलक पुस्तकं घ्यावं म्हणून ''अक्षरा''त गेलेलो असताना प्रभावळकरांच्या ''टिपरे'' ला मागं टाकून गाडगीळांच्या ''ताजतवानं'' न नकळत बाजी मारली.

दिवस परिक्षांचे होते, त्यामुळे वेळ मिळेल तसे पुस्तक वाचू लागलो. अवघ्या दोन पानांचा एक लेख. पेपरात लिहिताना छोटं लिहावं लागतं हे माहिती होतं. पण, ते छोट इतक छान लिहिता येत हे इथ दिसत होतं. पण, त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे ते फक्त लिहायच म्हणुन लिहित नव्हते तर त्यातून काही विचार देत होते, टिप्पणी करत होते. माणसांना ''ताजतवानं'' करणं हा त्यांचा स्थायीभाव आहे हे लोक 30 वर्ष जाणतात. ते त्यांनी करणं यात फारस नाविन्य नाही. पण, त्यातुन काही सांगण हे जास्त महत्वाचं आणि तेही सगळ्याना लगेच समजेल असं! गंमत म्हणजे यातल्याच काही मुद्यावर 4-4 पाने मी खरडल्याचे मला आठवते. पण, तेच त्यांनी 4 ओळीत त्याच ताकदीने मांडले. मग या निवेदकाच्या लेखणीला दाद द्यावयालाच हवी, नाही का?