दोन फुल्ल एक हाफ

दोन फुल्ल

महाराष्ट्रात वृत्तपत्राचं फार प्रस्थ, लोकांचा जीव की प्राणच अगदी!  मग, यात सदरं असायची, आहेत.चर्चा,भांडणे, विवाद सगळे वृत्तपत्राच्या माध्यमातूनच. पण जेवणात जसे पापड असतात तसे पेपरमध्येही   काहीतरी खमंग, कुरकुरीत पाहिजेच की.  पूर्वी दळवी, नंतर कणेकर असे पापड तळण्यात माहिर होते.  पण दळवी गेले, आणि, कणेकरांचे पापड पचेनासे, रूचेनासे झाले.  पण, जेवणात पापड तर पाहिजेतच.  मग, टीकेकर नामक आच्यार्‍याने आपल्या लोकसत्ता खानावळीसाठी  एका भल्या माणसाला बोलावले.  म्हणाले, ''तळ पापड!'' हा पापड तळू लागला.  पण आपण पापड तळायचे या भीतीने त्याने नाव बदलले .मग आच्यार्‍यानेच   त्याला वेटर केला.  ''तंबी ' म्हणून तो पापड तळू लागला.
            पहिल्यांदा घाबरला, पण नंतर इतका सरावला नी मग ''तंबीचा'' मुखवटा घालुन तो आपल्या लेखांच्या कडक कुरकुरीत पापडाने  इतरांचे मुखवटे फाडू लागला.  जगभरच्या रेसिपी त्याने एकत्र केल्या,  कधी लावणी पापड केला, तर कधी चौकशीचा पापड, कधी भजनाचा पापड, तर कधी परिक्षणाचा पापड.  सगळे पापड झकास जमलेले.  पापडाला लोणचे म्हणून तो बिरबल - बादशहांच्या गोष्टी सांगू लागला.  या पापडताला घास होणे मोठमोठया माणसांना अभिमानाचे वाटू लागले.  तर ''मुखवटा'' फाटलेल्यांना तो नकोसा वाटू लागला. पण, पापडाचे आणि त्या तंबीचे अस्त्त्वि मात्र  कोणालाच नाकारता येत नव्हते.  महिने गेली, वर्षे गेली,पापड मात्र आजही तळले जातात, बर, आजही या पापडाची चव सगळ्यांनाच आवडते.  त्यामुळे तोंड जरी भरपूर भाजले, तरी त्याविरूध्द आवाज कोणीच काढला नाही,आजही काढत नाहीत.आणि उद्याही काढणार नाहीतच. तोंड भाजले तरी लोक ठाण्याची  मामलेदारची मिसळ खातातच ना अगदी तसे. हळु हळु  पापड, लोणचे आणि तंबी तिन्ही प्रसिद्ध झाले, आवडते झाले, मग तंबीने आपल्या पापडांच्या रेसिपींचे पुस्तक काढले, आम जनता खुष झाली.   नुसती रेसिपी पुन्हा वाचायची, म्हणून दहा वर्ष जपून ठेवलेले ''लोकसत्ताचे '' चिटोरे रद्दीत गेले.  तंबी आला, त्याने लिहिले आणि समस्त लोक आनंदले, संपादक सुखावले, राज्यकर्ते हबकले आणि अवघा महाराष्ट्र हास्यरंगात बुडुन गेला.मग पुस्तक आल्यावर  एका केतकर नामक जाणकाराने त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आणि या रेसीपीज संजीव कपुरच्या रेसीपीपेक्षा जास्त खपु लागल्या, त्याला तीन -चार पुरस्कार मिळाले.पापड खातानाच वाचक अजुनही मराठी विनोदाची पातळी खालावलेली नाही याचा पुन: प्रत्यय घेऊन  खुष झाले.........
*******************

 महाराष्ट्राची जनता उत्तम होती.  जाणकार होती, पण काहिशी दुर्बळ होती. त्यांना एक वाईट सवय होती. सगळ्यांच्यात ओरडणारी माणसे एकेकटे मात्र मात्र गप्प बसायची.  त्यांच्यात अंगार होता.  पण ते विंदाच्या दगडाप्रमाणे ''दगड'' होते. त्यांना हिंमत होत नव्हती ,आवाज उठवायची. कुणी उठवलाच तर तो एकतर जिव्हारी लागायचा किंवा मग दाबला जायचा . पण, तंबीच्या माध्यमातून त्यांना आवाज मिळाला.  आपल्या जखमांच्या दगडांवर त्यांनी खुशाल तंबीला विनोदाचे पाते घासायला दिले.  मग हा तंबी त्यांना आपला वाटू लागला.  जे आपल्याला जमत नाही, ते करतोय म्हणून त्याचा अभिमान वाटू लागला.  पत्रकार विश्वात पापड तळणारा तंबी लोकांसाठी मात्र नेता होता.आपल्या तळलेल्या पापडातुन लोकांच्या भावना जगभर पोहोचवणारा नेता... तंबी दुराई.  त्यानेही मग, जनतेला वेगवेगळया लेखकांना भेटवले, जनतेच्या रोषाला पात्र राजकारण्यांचे बुरखे फाडले, त्याने लोकांनी जे सांगितले ते केले,लोकांच्या भावना कोणाला  दुखावता योग्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पोश्टमनी काम केले. कधी कधी तर लोकांनाच फटकारले.  पण, लोकांनी तंबीला आपलेसे केले.ते फटकारणे आपल्या भल्यासाठीच आहे हे त्यानी मनोमन मान्य केले. सगळेच या नेत्याच्या छत्राखाली जमु लागले. हसु लागले, विचार करु लागले,आणि क्वचित डोळ्यातुन पाणीही काढु लागले.  अडीच तास काम केल्यावर मान टाकणार्‍या जनतेने मग या अडीच उतारांच्या सदराला आपले मन देऊ केले.  पुढे पुढे तर  ''लोकसत्ता'' हातात आला की अगोदर तंबी वाचला जाऊ लागला.  बाकीच्या चर्चा ,लेख मग चकणा म्हणून आठवडाभर पुरायच्या, पुरतात!  मग, तंबीचे पुस्तक निघाले.  लोक आनंदली, सरवटेंनी स्वतः हुन चित्र काढून दिले.  पुस्तक आले, लोक हास्यात न्हाऊन निघाले. आपल्या भावना त्यांना परत मिळाल्या.
            लोकांना तंबी आवडला, मनापासून आवडला, कारण तंबी त्यांच्यातला होता.  त्याने कधी मनात द्वेष धरून टिका केली नाही.  लोकांच्या मनातल्या भावना फक्त आपल्या स्टाईलने मांडल्या.  त्यांनी पक्षपात  केला नाही.  कोणता विषय वर्ज्य मानला नाही.  महत्वाचे म्हणजे, फुकाचे टोमणे मारले नाहीत, आणि विनोदाचा डोस देताना चुकुनही उपदेशाचा डोस मात्र दिला नाही.
            म्हणुनच या वेटरच्या मुखवट्यातील तंबीला सुजाण मराठी  जनतेने डोक्यावर घेतले.  घ्यायलाच हवे होते.  त्या प्रेमामुळेच  आज १० वर्षानिही तंबी लिहितो.  आता तर त्याचा आवाका वाढला आहे.  तो यापुढेही असाच लिहित राहिला, नाही  त्याने लिहिलेच पाहिजे कारण तंबी नावाचा  मुखवटा आता त्या एका व्यक्तीचा राहिलेला नाही तो आता अख्या समाजाचा चेहरा, मुखवटा  झालेला आहे.........

**********************
एक हाफ


अशाच एका बुधवारच्या सकाळी ''तंबी'' च्या मुखवटयामागच्या पत्रकार माणूस विचार करत बसला होता. नक्की प्रसिध्द कोण ? लोकांना नक्की कोण आवडतं 'मी,'माझं लिखाणं?'' का ''मुखवटयाचं'' लिखाणं?का तो वेटरचा मुखवटाच? लोक मला ओळखत नाहीत, पण माझ्या या कधीही फेकता येणार्‍या मुखवटयाला ओळखतात? मला स्वतःला ओळखच नाही का? पुस्तकावर सुद्धा मला माझे नाव छापता येत नाही , हा माझा जय की पराजय?असे प्रश्न वाढत चालले होते पण तेवढयात त्याच्या मनातुन उत्तर आले .काहीच नाही,असे काहीच नाही .कारण हे मी कुठे लिहितोय? हे मी लिहित नाही. समस्त जनतेने ईश्वराला साकडे घातले आणि त्याने त्याचे काम या लेखणी आणि मुखवटयातुन माझ्याकडे दिले. कर्ता, करविता तो, माझ्याकडून मेहनत करून घेणारा तोच .लिखाण्ची स्फुर्ती , वेगवेगळे फॉर्म त्याच ताकदीने हाताळायला देणारा तो... मेहनत करुन घेणाराही तो. त्याक्षणी टिकेकरांसमोर माझा होकार देणाराही तोच..कारण त्या होकारावर मी आज आहे. नाहीतर हा मुखवटा मला मिळालाच नसता.मी फक्त निमित्तमात्र. आणि, प्रसिद्धी म्हणाल तर देव प्रत्यक्षात कुणी पाहिलेला नाही, तरी त्याची लोक भक्ती करतात. आणि, मलाही कोणी पाहिलेले नाही, पण माझी स्तुती करतात. ''है ना लाख टके लाख की बात .......'' तो स्वत:शीच हसला, समाधानी हसला आणि झटकन तंबीचा मुखवटा चढवून पुढचे अडीच ग्लास भरायला लागला....





तंबीचा फॅन
विनायक पाचलग

0 comments:

Post a Comment